वेदमंत्रांचा उद्घोष, मंगल वाद्यांचा गजर, तोफेची सलामी आणि अंबामाता की जय चा जयघोष अशा वातावरणात करवीर निवासिनी अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण असा कलाकर्षण विधी गुरुवारी संपन्न झाला. श्री जगदंबेची उत्सवमूर्ती आणि प्राणतत्त्व काढलेला कलश यांची सिंहासनावर प्रतिष्ठापणा करण्यात आली आणि मुख्य गाभारा बंद झाला. आता गाभाऱ्यातील देवीचे दर्शन ६ ऑगस्टच्या दुपारनंतरच भाविकांना होणार आहे.
गुरुवारच्या विधींना सकाळी १० वाजता सुरुवात झाली. कोणत्याही देव मूर्तीवरील दुरुस्ती, प्रक्रिया वा अन्य काही करावयाचे झाल्यास प्रथम त्यातील प्राणतत्त्व गंगाजलामध्ये काढून कलशात ठेवले जाते. या विधीला कलाकर्षण असे म्हटले जाते. दर्भाच्या कुच्र्याने मूर्तीला स्पर्श करून ते गंगाजलात टेकविले जाते. या वेळी विविध मंत्राचा उद्घोष सुरू असतो. त्यानंतर तो कलश वरून झाकणे लावून बंद केला जातो. कार्य समाप्तीनंतर पुन्हा त्यातील प्राणतत्त्व याच प्रकारे मूर्तीमध्ये घातले जाते. मूर्तीवर कारागिरी करण्याआधी हा विधी करणे आवश्यक असते. पंडित राजेश्वरशास्त्री जोशी व सहकाऱ्यांनी या विधीची पौरोहित्य केले.
गुरुवारचे इतर कार्यक्रमात मुख्य यज्ञ मंडपात श्रीमंत्र होम हे विधान पार पडले. श्री जगदंबेच्या मूलमंत्राचा जप व त्याचे हवन असा हा विधी असतो. या होमानंतर उमेश उदगावकर व धनश्री उदगावकर या यजमान दांपत्यानी नित्याची आरती केली. काल सायंकाळी आरतीसाठी येथील चित्रदुर्ग मठाच्या स्वामींनी उपस्थित राहून भाविकांना आशीर्वाद दिले. उद्यापासून सर्व विधी मुख्य यज्ञ मंडपात होणार असून सहस्रचंडी व श्री सप्तलक्ष जप या महाअनुष्ठानाची सुरुवात होणार आहे.
वेदमंत्रांच्या घोषात महालक्ष्मीचा कलाकर्षण विधी
वेदमंत्रांचा उद्घोष, मंगल वाद्यांचा गजर, तोफेची सलामी आणि अंबामाता की जय चा जयघोष अशा वातावरणात करवीर निवासिनी अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण असा कलाकर्षण विधी गुरुवारी संपन्न झाला.
आणखी वाचा
First published on: 24-07-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritual of mahalaxmi celebrated with enthusiasm