लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीतून दोन दिवसांपूर्वी बाहेर पडलेल्या संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने सांगलीतून त्यांची अटीतटीचा सामना काँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्याशी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. संजय पाटील यांना पक्षाने उमेदवारी देऊन गेल्या निवडणुकीच्या वेळी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा पायंडा रोखला असला, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातील नाराजीचा लाभ भाजपा उठविण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपापेक्षा काँग्रेस आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे.
संजय पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत राष्ट्रवादीच्या फुटीला तेच जबाबदार असल्याचे आरोप करीत पक्षत्यागाची तयारी दर्शविली होती. पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावत खुलाशाची प्रतीक्षा करीत सामोपचाराचे प्रयत्न केले. मात्र संजय पाटील यांनी या प्रयत्नांना भिक न घालता भाजपाच्या तंबूत विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना प्रवेश करून पक्ष नेतृत्वावर राजकीय मात केली. त्यांचा पक्षप्रवेश साजरा होतो न होतो तोच अवघ्या ४८ तासांत पक्षाची त्यांना लोकसभेसाठी त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. म्हणजे त्यांचा पक्षप्रवेश ही केवळ पूर्वनियोजित औपचारिकताच होती हे स्पष्ट होते.
केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना विद्यमान खासदार म्हणून पुन्हा संधी मिळणार हे स्पष्ट आहे. तसेच प्रतीक पाटलांची उमेदवारी जाहीर होणार हे गृहीत धरून कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यांने उमेदवारीसाठी आग्रह धरलेला नाही. एके काळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी उमेदवारीसाठी दिल्लीपर्यंत धडक दिली होती. मात्र या वेळी कोणत्याही कार्यकर्त्यांने उमेदवारीसाठी प्रयत्न केले नाहीत यावरून काँग्रेस प्रस्थापितांच्या पलीकडे पाहतच नसल्याचा सर्वसामान्य काँग्रेस जनांचा दृढ समज आहे.
प्रतीक पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी मदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी आघाडीचे उमेदवार म्हणून मदानात उतरलेल्या प्रतीक पाटलांना राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर भाजपाने पुरस्कृत केलेल्या अपक्ष अजित घोरपडे यांच्याशी सामना करावा लागला होता. त्या वेळी प्रतीक पाटलांना ३९ हजारांचे मताधिक्य मिळवता आले.  
काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवत असली, तरी सांगलीतील परिस्थिती वेगळी असू शकते. जत येथील विलासराव जगताप, आटपाडी येथील राजेंद्र देशमुख, कडेगाव येथील पृथ्वीराज देशमुख, कवठेमहांकाळचे अजित घोरपडे यांनी ‘दुष्काळी फोरम’च्या माध्यमातून आपली राजकीय ताकद सातत्याने जिवंत ठेवली आहे. या दुष्काळी फोरममध्ये भाजपाचे उमेदवार संजय पाटील हे आग्रभागी होते. त्यांचा संघर्ष जसा आर.आर.पाटील यांच्याशी आहे. तसाच संघर्ष प्रस्थापित व्यवस्थेशी आहे. दुष्काळी फोरमच्या बहुसंख्य नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली, तरी बदलत्या परिस्थितीत काँग्रेसला सांगली म्हणजे बालेकिल्ला समजणे धोक्याचे ठरू शकते.