कासाजवळ कोचाई पूल पाण्याखाली; वाडय़ात शेतात पाणी शिरल्याने पिकांच्या हानीची भीती
कासा : रविवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे डहाणू, वाडा आणि तलासरी तालुक्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. डहाणू तालुक्यातील कोचाई येथील नदीला आलेल्या पुरामुळे पारसपाडा पूल पाण्याखाली गेल्याने शेजारच्या चार गावांचा संपर्क तुटला आहे. तर वाडा तालुक्यातील सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने देहेरजा नदीला महापूर आला.
दरम्यान धरणात आतापर्यंत ६६ मीटर पाणी पातळी असून १९.३१ द.ल.घ.मी पाणीसाठा झाले आहे. तर १९.४५ क्यूसेक पाणी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्ग करण्यात आले आहे. त्यामुळेच वरोली नदीला मोठा पूर आल्याने झरी खाडी येथील पूल पाण्यात गेल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
तर कोचाई पाटीलपाडा येथे ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या नवीन पुलाचे काम अर्धवट सोडून दिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. अर्धवट सोडून दिलेल्या कामामुळे शाळा महाविद्यालयात जाणारी मुले, औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे खरेदी करण्यासाठी जाणारे शेतकरी, रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे अवघड होऊन बसले आहे. तर नागरिकांना ये-जा करताना हाल सहन करावे लागत आहेत. नाइलाजाने १५ किमी. लांब फिरून जावे लागत असून, काही वाहनचालक हातात फावडे घेऊन रस्त्यावरील खडी, दगड, गोटे बाजूला सारून तात्पुरता रस्ता बनवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. याबाबत तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.तालुक्यातील दुग्ध प्रकल्पाचे कुर्झे येथील धरणाच्या पाण्यात वाढ झाली असून सुरुवातीपासून धरणारी पाणी विसर्ग केले जात आहे. धरण परिसरात गेल्या नऊ महिन्यांपासून होणाऱ्या भूकंपामुळे धरणाला धोका निर्माण होऊ नये आणि त्याची देखभाल दुरुस्तीसाठी दोन कोटींची मागणी केली आहे.
वाहतूक सहा तास ठप्प
वाडा : सोमवारी मुसळधार पावसाने वाडा तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला. काही नद्यांवरील पूल, तसेच रस्त्यावरील मोऱ्या पाण्याखाली गेल्याने येथील वाहतकू ठप्प झाली, तर अनेक गावांचा तीन दिवसांपासनू संपर्क तुटला आहे. शनिवारपासून वाडा तालुक्यात पाऊस सुरू होता. सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने देहेरजा नदीला महापूर आला. त्यामुळे ब्राह्मणगाव-कुझ्रे या दरम्यान असलेला पूल दिवसभर पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. त्याचप्रमाणे गारगाई नदीला आलेल्या पुरात शिलोत्तर- गारगांवदरम्यान असलेला पूल पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली होती. दरम्यान, गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांनी भात लावणीची कामे थांबवली आहेत. अनेक शेताचे बांध वाहून शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.