महाराष्ट्राच्या सीमाभागातील कागल येथे शुक्रवारी पहाटे ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त झालेल्या क्वालिस गाडीतील चार महिला जागीच ठार झाल्या असून, इतर सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कोल्हापूरच्या प्राथमिक आणि खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण मुळचे सोलापूरचे असून सध्या ते ठाणे जिल्ह्यातील वसई भागात राहत होते. जखमींमध्ये कांता महादेव कोकरे, वनिता तानाजी घोटुगडे, राकेश धर्मा भोई, सुमन बापू  गोरड, जगन्नाथ जयराम भोई आणि तानाजी पांडुरंग घोटुगडे यांचा समावेश आहे.  हा अपघात झाला तेव्हा गाडीत एकूण १० जण होते. हे सर्वजण काल संध्याकाळी वसईहून  चिंचणीमायक्का यात्रेसाठी निघाले होते. शुक्रवारी पहाटे येथील रस्त्यावरून जात असताना त्यांच्या क्वालिस गाडीचे टायर अचानक फुटले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नेमक्या याचवेळेला रस्त्यावर मागून येणाऱ्या एका ट्रकने या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, क्वालिस गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला.

Story img Loader