मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. रायगड जिल्ह्य़ातील गोरेगावजवळ झालेल्या अपघातात ३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
खेड येथील खासगी बस अपघातानंतरही मुंबई-गोवा महामार्गावरील बेदरकार वाहन चालकांचे प्रमाण कमी झालेले नाही. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास गोरेगावजवळील टेम्पालेजवळ झालेल्या अपघातात याचाच प्रत्यय आला. टवेरा आणि मारुती व्हॅन समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
टवेरा गाडी मुंबईहून चिपळूणकडे जात होती, तर मारुती व्हॅन महाडकडून पनवेलच्या दिशेने जात होती. मात्र टवेरा चालकाचा गाडीवरील ताबा चुकल्याने गाडी समोरून येणाऱ्या मारुती व्हॅनला जाऊन धडकली. यात व्हॅनमधील प्रभाकर पाटेकर वय ६८, राहणार चिपळूण; विनायक पावसकर, वय ३५, राहणार संगमेश्वर आणि रामदास गुरव, वय ३५, राहणार बांद्रा या तिघांचा मृत्यू झाला. तर दोन्ही गाडय़ांमधील १५ जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबईला हलविण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्य़ाच्या हद्दीत झालेला गेल्या सहा महिन्यातील १६२वा अपघात आहे. पेण ते पोलादपूर या टप्प्यात झालेल्या अपघातात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ७६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर या अपघातांमधे २२६ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर २२३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
पळस्पे ते इंदापूर दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे, मात्र अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या महामार्गाचेही चौपदरीकरण करण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे.

Story img Loader