भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, तसेच त्यांना अल्प मोबदला देण्यात येत असल्याने श्रमजीवी संघटनेने भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस येथे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित कंपनीचे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाचे चौपदरी करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या बदल्यात त्यांना अल्प मोबदला देण्यात येत असल्याने शेतकरी ते स्वीकारण्यास तयार नाहीत. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार आणि या रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हा चिटणीस विजय जाधव यांनी यावेळी केली.