गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना आज सोमवार, १५ एप्रिलपासून कर लावण्यात येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जनतेत असंतोष आहे. त्यासाठी ट्रक- टेम्पो मालकांनी गोव्याचा माल उद्यापासून भरला जाणार नसल्याचे सांगून मंगळवारी बांदा पत्रादेवी येथे रास्ता रोको करून गोव्यातील वाहनांना अडविले जाणार असल्याचे सांगितले.
गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील दोडामार्ग, सावंतवाडी-बांदा व आरोंदा किरणपाणी या तीन ठिकाणी प्रवेश करण्याचे मार्ग आहेत. गोवा राज्याने सहा ठिकाणी प्रवेश करासाठी नाकी बनविली आहेत, त्यातील तीन नाकी सिंधुदुर्ग महाराष्ट्र प्रवेशद्वारावर आहेत.
गोवा राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई आदी भागांतील शेकडो वाहने दररोज जातात. त्यामुळे प्रवेश करापोटी लाखो रुपये प्रत्येक दिवशी जमा होणार आहेत. ट्रकसाठी एक हजार, टेम्पो व रुग्णवाहिकासह अन्य गाडय़ांसाठी दोनशे पन्नास रुपये घेतले जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून दररोज शेकडो वाहने व रुग्ण गोवा राज्यात प्रवेश करतात, त्या सर्व वाहनांवर प्रवेश कराची आकारणी करण्यात येत असल्याने टेम्पो, ट्रक, प्रवासी खासगी गाडय़ा, रुग्णवाहिकांना आर्थिक भरुदड बसणार आहे. त्यामुळे लोकांची नाराजी गोवा सरकारने ओढून घेतली आहे.
कर्नाटक राज्यातील ट्रकमालक संघटनेने गोवा राज्याचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसाच निर्णय सावंतवाडी-सिंधुदुर्ग ट्रक-टेम्पो मालक संघटनेने घेतला आहे. जोवर गोवा राज्य प्रवेश करात सूट देणार नाही तोवर गोवा राज्यात पुरवठा करणारी वाहने पाठवू नयेत असे ठरविले आहे. गोवा राज्यात जाणारी वाहने रोखली जाणार आहेत. शिवाय गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखून गोवा सरकारसमोर पेचप्रसंग उभा करण्याचा निर्णय ट्रक -टेम्पो मालक संघटना, हद्दीवरील ग्रामपंचायती आणि राजकीय संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे उद्या सोमवारी महाराष्ट्र-गोवा हद्दीवर आंदोलनाची चकमक उडणार आहे. गोवा व सिंधुदुर्ग यांचे नाते जवळचे आहे. विशाल गोमन्तकचा भाग म्हणून सिंधुदुर्गची ओळख आहे. गोव्यात सिंधुदुर्गातील नोकरी, रुग्णालयनिमित्त तसेच पर्यटन व पुरवठय़ासाठी अनेक वाहने दररोज जात-येत असतात. त्यामुळे सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना वगळावे अशी मागणी आहे, पण गोवा सरकारने या मागणीला दाद दिली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील रास्ता रोको आंदोलन यशस्वी करून गोवा भाजप सरकारचे नाक आवळण्याचा प्रयत्न  सोमवारी केला जाईल, असे सांगण्यात आले. गोवा भाजप सरकारच्या आडमुठय़ा धोरणाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राजकीय पक्ष रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील, असे सांगण्यात आले.
या आंदोलनामुळे महाराष्ट्र व गोवा राज्याची संघर्षांची भूमिका तयार होईल, असे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा