मुरुड तालुक्यातील डोंगरी- राजपुरी रस्त्याचे रुंदीकरण काम वनविभागाने हस्तक्षेप घेतल्यामुळे हे काम रखडले आहे. उजव्या बाजूस खोल दरी व डाव्या बाजूसच रस्ता रुंदीकरणाचा एकमेव पर्याय आहे. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटकांना हा एकमेव रस्ता असताना वाढती पर्यटक संख्या व वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन हा रस्ता तातडीने पूर्ण झालाच पाहिजे, यासाठी राजपुरी ग्रामस्थांच्या वतीने रायगड जिल्हा शेकाप चिटणीस मंडळ सदस्य गणेश मोन्नाक यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासन जागृत झाले व तातडीने मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता कापरे यांनी रोहा येथील जिल्हा वनअधिकारी वाळुंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून हा रस्ता करण्याची परवानगी मागितली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने कापरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता ते म्हणाले की, वनविभागाकडे डोंगरी-राजपुरी रस्त्याच्या रुंदीकरणाची परवानगी मागितली असून, ती लवकरच मिळणार आहे, तसेच आमदार मीनाक्षी पाटील यांच्या प्रयत्नातून साध्य झालेला डोंगरी सन सेट पॉइंटला भविष्यात आडकाठी येऊ नये यासाठी त्याचीसुद्धा परवानगी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही कामास परवानगी मिळेल, असा विश्वास कापरे यांनी व्यक्त केला. गणेश मोन्नाक यांनी सांगितले की, कापरे यांनी विश्वास दिला आहे की परवानगी मिळणार आहे. तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करीत आहोत. वनविभागाने परवानगी नाकारली तर समस्त राजपुरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.