राज्यात उद्योग आणि व्यापारासह विविधांगी विकासाला गती मिळण्यासाठी रस्त्यांचे जाळे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथील नियोजित १२० मीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, कोकणात उद्योग, व्यापार, पर्यटन, बंदरे इत्यादींच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. पण त्यासाठी उत्तम रस्त्यांची गरज आहे. परचुरी येथील नियोजित पुलामुळे या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय दूर होण्याबरोबरच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळू शकेल. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सी वर्ल्ड प्रकल्प, कोकणाच्या किनाऱ्यावरील सहा बंदरांच्या विकासासाठी खासगी क्षेत्रातून केली जात असलेली गुंतवणूक या प्रदेशाचे आर्थिक चित्र पालटवू शकते. मात्र त्यासाठी सर्वत्र रस्त्यांचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे.
राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या अन्नसुरक्षा, राजीव गांधी जीवनदायी योजना, सुकन्या योजना इत्यादींची माहिती देत पवार यांनी, जैतापूर प्रकल्पासारख्या उपक्रमांना विरोध करणाऱ्या, कोकणच्या विकासाच्या आड येणाऱ्या लोकांना आगामी निवडणुकीत खडय़ासारखे बाजूला ठेवा, असे आवाहनही केले.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे हेही या प्रसंगी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचेही भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील, विशेषत: ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंसाठी शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या योजनांचा उल्लेख करून नियोजित क्रीडा संकुलाचा कोकणातून उत्तम खेळाडू तयार करण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन केले.
सुमारे १३ कोटी रुपये खर्चाच्या या संकुलाची धारावी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाच्या धर्तीवर उभारणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. विविध खेळांमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा