|| निखिल मेस्त्री

बेकायदा जाहिरात फलकांसाठी नव्या रस्त्यात खड्डे; नगरपरिषद अंधारात

पालघर नगर परिषद हद्दीत बेकायदा पद्धतीने कमानी उभारून त्यावर जाहिरातींमुळे विद्रूपीकरण करण्यात येत आहे. मात्र नगर परिषद प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. दरम्यान संबंधित ठिकाणी पथकाला पाठवून त्याचा अहवाल घेतो, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद पाटील यांनी सांगितले.

माहीम रस्त्यावरील एचडीएफसी बँकेजवळ शहरातील एका नामांकित खासगी बांधकाम व्यावसायिकाने जाहिरातीची कमान बेकायदा पद्धतीने उभी केली आहे. तीन दिवसांपासून हा रस्ता पूर्णपणे त्यामुळे झाकला गेला आहे. याशिवाय कचेरी रस्त्यावर सरकारी रुग्णालयाकडे एका शाळेच्या वतीने जाहिरातीसाठी कमान उभारली आहे. माहीम रस्त्यावर असलेली जाहिरात कमान उभी करताना रस्त्यात लोखंडी सळ्या रस्त्यात ठोकून त्याआधारे ही संपूर्ण कमान उभी केली आहे. यासाठी लोखंडी सळ्या रस्ता खोदून त्यात गाडल्या गेल्या आहेत.

कमानींसाठी परवानगी देणाऱ्या नगर परिषद प्रशासनाने या प्रकाराकडे डोळेझाक केली असून बांधकाम व्यावसायिक आणि शाळा प्रशासनाला येथे कमान बांधण्यासाठी काहींना हाताशी घेऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे.

नगर परिषद हद्दीत जाहिरात करण्यासाठी एक खासगी ठेकेदार काम करीत आहे. यासाठी त्याला नगर परिषदेने ठिकाणे ठरवून दिली आहेत. त्यानुसार त्या ठिकाणी त्यामार्फत जाहिरात घेऊन जाहिरात केली जाते, मात्र रस्त्यावर या बांधकाम व्यावसायिकाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जाहिरात कमान उभी केली आहे.

नगर परिषद हद्दीत एखाद्या जागेवर जाहिरात करण्यासाठी करनिर्धारण विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तशी उभारणी करणे अपेक्षित आहे. नगर परिषदेच्या परवानगीची प्रत किंवा परवानगी क्रमांक व ती किती काळासाठी आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असतानाही तो करण्यात आलेला नाही.

ही जाहिरात कमान उभी करण्यासाठी लोखंडी साच्याला आधार राहावा यासाठी थेट रस्त्यातच सळ्या ठोकून त्याआधारे कमान उभी करण्यात आलेली आहे. यामुळे जाहिरातीपोटी ही कमान जरी उभी असली किंवा या जाहिरातीमुळे नगर परिषदेला महसूल मिळत असला, तरी या महसुलपोटी नगर परिषदेचा कोटय़वधी रुपयांचा रस्ता मात्र खड्डय़ात जाणार आहे असेच चित्र आहे. ही कमान उभी करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्टीत संबंधित कमान उभी करणाऱ्याने थेट लांबलचक लोखंडी सळ्या रस्त्याच्या मध्यभागी व साइडपट्टीला खोलवर ठोकल्या आहेत, त्यावर ही कमान आधार धरून उभी आहे. असे असले तरी लोखंडी सळ्या ठोकलेल्या ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने ही कमान व रस्त्यात ठोकलेल्या सळ्या काढल्यानंतर या ठिकाणी खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.

कमानी उभारून त्यावर जाहिरात करण्याची परवानगी संबंधितांनी आमच्याकडून घेतलेली नाही.-विश्वास पाटील, कर विभाग

Story img Loader