मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी आता वेगळे वळण घेतले असून अहमदनगर येथील घटनेचे पडसाद बुधवारी येथे मनसेच्या बालेकिल्ल्यातही उमटले. मनसेच्या संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. जळगावमध्येही मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. आंदोलनांची ही मालिका सुरू असली तरी बारावीच्या परीक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही.
मुंबई नाका येथील आ. वसंत गिते यांच्या कार्यालयाबाहेर सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्ते जमा होण्यास सुरूवात झाली होती. त्यातील एका गटाने पोलिसांची नजर चुकवून महामार्गावरील उड्डाणपुलावर धाव घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर आ. गिते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई नाका चौकात रास्तारोको केला. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मध्यवर्ती बस स्थानक चौकात राज यांच्या पुतळ्याचे दहन करून ठिय्या दिला. या आंदोलकांना पोलिसांनी हटविले. पेठरोडवरही या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही काळ वाहतूक रोखून धरली. आंदोलनांचा हा जोश तेवढय़ापुरताच राहिल्याने शहरातील दैनंदिन व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. इयत्ता बारावीचा पेपर विनासायास पार पडल्याची माहिती उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. बुधवारी कला व वाणिज्य शाखेचा ‘पुस्तक पालन आणि लेखाकर्म’ या विषयाचा पेपर होता. तो सुरळीत पार पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.