पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सातत्याने प्रस्तुत प्रतिनिधीने वृत्तपत्रांद्वारे व्यक्त केलेल्या जनभावनांच्या बातम्यांमुळे पोलादपूर येथील सबडिव्हिजनकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे झालेल्या पाठपुराव्याला यश येऊन तब्बल २ कोटी १० लाख खर्चाच्या रस्ता नूतनीकरण कामाच्या निविदा पीडब्ल्यूडीच्या वेबसाइटवर अधिकृतरीत्या जाहीर झाल्या आहेत. यासंदर्भात पोलादपूर सबडिव्हिजनने तीन टप्प्यांत कामाचा मागणीप्रस्ताव सादर केला असून ३१ डिसेंबरपूर्वीच आंबेनळी घाटातील पोलादपूर तालुक्यातील रस्ता नूतनीकरण पूर्ण होण्याचा आशावाद संबंधित डेप्युटी इंजिनीयरकडून व्यक्त होत आहे.
ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या ‘फिटझ्गेराल्ड’ व शिवकाळापासून सुरू असलेल्या रडतोंडीचा घाट यातून आंबेनळी घाटाची निर्मिती झाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे केवळ खड्डे बुजविण्याच्या कामातून मलिदा काढणारे वाढीस लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दर्जाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. या घाटामध्ये सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेऊन दरडग्रस्त क्षेत्रात गॅबियन नेटवर्क बांधण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्याकडेही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे पोलादपूर वाई सुरूर या रस्त्याची अवस्था दयनीय व असुरक्षित झाली आहे. त्यामुळे यामाग्रे जाणारे प्रवासी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून पुणे मंगरूळू हायवेवरून शिरवळ फाटय़ावरून महाबळेश्वर, पार व प्रतापगडाकडे जाण्यासाठी या मार्गाची दुरवस्था कायम ठेवली जात असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या पावसाळय़ात या घाटात दोन-तीन वेळा दरडी कोसळून वाहतूक एकेरी करावी लागली असल्याच्या घटनांनीदेखील वृत्तपत्रांखेरीज कोणीही या आंबेनळी घाटाच्या डागडुजीसाठी पाठपुरावा केला नाही. यामुळे वाई येथून भाजीविक्रेत्यांच्या गाडय़ा, विक्रम रिक्षांद्वारे होणारी प्रवासी वाहतूक, पोलादपूर-महाबळेश्वर जीपप्रवासी वाहतूक तसेच सर्वसामान्यांच्या मोटारसायकल व फोरव्हिलर आदी वाहनांना खड्डय़ांतून वाहने चालविण्याची कसरत करावी लागत आहे. पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्ग क्र. ७२ या रस्त्यावरील रानबाजिरे ते पायटे-आडपर्यंतच्या सुमारे ७ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी तब्बल २ कोटी १० लाख रुपये खर्चाची निविदा पीडब्ल्यूडीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहे. याखेरीज, त्यापूर्वीच्या ३ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी १.२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे तसेच घाटातील १८ ते २१ कि.मी. हा ३ कि.मी. रस्ता होण्यासाठी पोलादपूर सबडिव्हिजनचे कसोशीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती डेप्युटी इंजिनीयर एस.एन. जाधव व ज्युनियर इंजिनीयर माळवदे यांनी दिली.
परिणामी, पोलादपूर ते महाबळेश्वर या राज्यमार्ग क्र. ७२ वरील रस्त्यापकी २२ कि.मी अंतराचा पोलादपूर सबडिव्हिजनच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्याचे येत्या दोन महिन्यांत नूतनीकरण होऊन यामाग्रे नियमित प्रवास करणाऱ्यांची गरसोय दूर होणार असून तत्पूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती या वेळी डेप्युटी इंजिनीयर एस.एन. जाधव यांनी दिली.
पोलादपूर ते महाबळेश्वर रस्ता नूतनीकरणासाठी २.१० कोटींच्या निविदा जाहीर
पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सातत्याने प्रस्तुत प्रतिनिधीने वृत्तपत्रांद्वारे व्यक्त केलेल्या जनभावनांच्या बातम्यांमुळे पोलादपूर येथील सबडिव्हिजनकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे झालेल्या पाठपुराव्याला यश येऊन तब्बल २ कोटी १० लाख खर्चाच्या रस्ता नूतनीकरण
आणखी वाचा
First published on: 13-11-2012 at 03:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road renovation from poladpur to mahabaleshwar