लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : पुण्यात हडपसर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना झाल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. महापुरूषांच्या पुतळ्यांची, स्मारकांची विटंबना रोखण्यासाठी गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होण्यासाठी कायदा लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुंबई-हैदराबाद महामार्गाच्या बाह्यवळणाजवळ सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात हे आंदोलन झाले. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन थांबविले.

आणखी वाचा-मंगळवेढ्यात नायब तहसीलदारासह दोघे लाच प्रकरणात जेरबंद, उपविभागीय अधिकाऱ्याचीही होणार चौकशी

या आंदोलनात प्रामुख्याने संघ परिवाराशी संबंधित बजरंग दलासह गोरक्षक संघ, हिंदूराष्ट्र सेना, श्रीराम युवा सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संघटनांचा सहभाग होता. गोरक्षक संघाचे सुधाकर बहिरवाडे यांनी गडकिल्ल्यांवर वाढलेली अतिक्रमणे दूर करण्याची मागणी केली. रवी गोणे (हिंदूराष्ट्र सेना), नागेश बंडी, अंबादास गोरंट्याल ( बजरंग दल), पुरूषोत्तम कारकल (शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), राजकुमार पाटील (श्रीराम युवा सेना) आदींचा या आंदोलनात सहभाग होता.