लक्ष्मण राऊत
जालना : रस्ता कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे आणि शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परस्परांचे केलेले कौतुक हा या भागातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झालेला आहे. खासदार जाधव जरी परभणीचे लोकसभा सदस्य असले तरी त्यांच्या मतदारसंघात टोपे यांच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या नव्या कौतुक सोहळय़ामुळे राजेश टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे हिकतम उढाण मात्र अस्वस्थ झाले. ‘मॅनेज’ अशी त्यांची प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये व्यक्त केली. या नव्या जवळिकीमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविताना त्यांना शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांच्याशी जोरदार संघर्ष करावा लागला होता. या अटीतटीच्या निवडणुकीत टोपे यांचा विजय झाला तरी त्यांच्या आणि डॉ. उढाण यांच्या मतांमध्ये जवळपास तीन हजार ४०० मतांचे अंतर होते. टोपे यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाणाऱ्या घनसावंगी नगरपंचायतीमध्येही राष्ट्रवादीचे नऊ तर शिवसेनेचे सात सदस्य निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेचे खासदार जाधव यांनी जाहीररीत्या केलेली टोपे यांची भलामण साहजिकच चर्चेचा विषय झालेली आहे. घनसावंगी तालुक्यातील रस्ते कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने टोपे आणि खासदार जाधव यांचा एकाच गाडीतून प्रवास झाला.
घनसावंगी येथील कार्यक्रमात जाधव म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे टोपे यांचे वजन आहे. मुख्यमंत्री त्यांनी सुचविलेली कामे करतात असे सांगताना त्यांनी एका स्वस्त धान्य दुकानाचा संदर्भही दिला. सलग पाच वेळेस विधानसभेवर निवडून आलेल्या टोपे यांच्या संदर्भात खासदार जाधव म्हणाले, आमदार म्हणून निवडून येणे एवढे सोपे नसते. त्यासाठी कामात सातत्य ठेवावे लागते. विरोधी पक्षाची फोडाफोडी करावी लागते, जोडा-जोडी करावी लागते. निवडून आल्यावर काही जण नाराज होतात.कधी-कधी सोबतच्याच लोकांना अंगावर घेण्याची वेळ येते. राजेश टोपे यांचे सहकार, शिक्षण यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत जाळे आहे. त्यांची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. त्यांच्यासमोर निवडून येणे सोपे नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघात टोपे यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांचा संदर्भही खासदार जाधव यांनी या वेळी दिला. त्या वेळी डॉ. उढाण आमदार होणार असे सर्वाना वाटत होते आणि वातावरणही तसेच होते. परंतु टोपे जिंकले आणि डॉ. उढाण पराभूत झाले. डॉ. उढाण यांचे वातावरण सर्वत्र जाणवत असले तरी टोपे तळापासून निवडणूक लढले. त्यामुळे त्यांच्यासमोर लढणे तेवढे सोपे नाही, असेही खासदार जाधव म्हणाले.
प्रतिक्रिया नकोच!
शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांच्याकडून पराभूत झालेले आहेत. उढाण यांना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याच पक्षाच्या खासदाराची टोपे यांच्याशी झालेली जवळीक आवडली नसल्यानेच त्यांनी या संदर्भात समाजमाध्यमांवर ‘मॅनेज’ अशी प्रतिक्रिया दिली. ‘लोकसत्ता’शी बोलताना मात्र त्यांनी या संदर्भात काहीही बोलणे टाळले.
‘हे तर धर्मपालन’
राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एक पदाधिकारी आणि मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड या संदर्भात म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने तिन्हीही घटक पक्षांना सोबत घेऊन राजेश टोपे चालत असतात. त्यामुळे खासदार जाधव आणि टोपे यांचा एकत्रित कार्यक्रम झाला यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हा तर महाविकास आघाडीचा धर्म असून विकासाचे राजकारण करणारे टोपे यांनी या धर्माचे पालनच केलेले आहे.