न्हवरा फाटा ते जामखेड या रस्त्याचे श्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव या परिसरातील काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामध्ये आढळगाव परिसरातील अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ठेकेदाराच्या विरोधात सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू केले आहे.
हा रस्ता प्रचंड वाहतुकीचा आहे. अवजड व हलकी अशी वाहने या परिसरामधून मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करतात. निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीला या कामाचा ठेका मिळाला आहे. ठेकेदार कंपनीने आढळगाव येथे मागील तीन महिन्यांपूर्वी गावांमधील रस्ता खोदून ठेवला आहे आणि तेव्हापासून कामही बंद आहे, यामुळे अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतुकीस सतत अडथळा होत असून ग्रामस्थ, नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत शाळा, दवाखाना व नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या काम करताना फोडले यामुळे या सर्व परिसराचा पाणीपुरवठा तीन महिन्यांपासून बंद रस्ता खोदून ठेवल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धूळ उडत असून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या व्यापाऱ्यांना श्वसनाचा आजार निर्माण झाला असून दमा असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यूदेखील झाला आहे.
विशेष म्हणजे महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचेदेखील या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. अखेर यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी आढळगाव ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. ठेकेदाराने ग्रामस्थांना केवळ लेखी आश्वासन न देता कोणत्या पद्धतीने व कसे दर्जेदार आणि कोणत्या वेळेत काम करणार याचे टाईम बॉण्डिंग करून दिले तरच व महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनीदेखील तसे लेखी दिल्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात येईल, अन्यथा काम पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थ आंदोलन सुरूच ठेवतील असा इशारा सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी दिला आहे.