मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरोडा टाकून १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून फरार झालेल्या अट्टल दरोडेखोरांना व लुटीतील सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराला खालापूरच्या पोलीस यंत्रणेने मुद्देमालासह गजाआड केले आहे. फिर्यादी हिरेन कानाबार (रा. मुंबई) हे २१ सप्टेंबर २०१२ रोजी आपली पत्नी व मुलांना बरोबर घेऊन होंडा सिटी कारने मुंबईहून- पुण्याला, द्रुतगती महामार्गावरून मार्गक्रमणा करीत होते. अज्ञात दरोडेखोरांनी द्रुतगती महामार्गावर खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरद गावाजवळ (किलोमीटर स्टोन २४) मोठमोठे दगड टाकले होते. त्यामुळे भरधाव वेगाने मार्गक्रमणा करणाऱ्या होंडासिटी कारचे टायर पंक्चर झाले. कारच्या चालकाने रस्त्याच्या कडेला कार उभी केली. वाहनचालक टायर बदलत असताना फिर्यादी हिरेन कानाबार कारजवळ उभे होते. तेव्हा रस्त्यालगत झाडाझुडपात लपलेल्या अट्टल दरोडेखोरांनी वाहनचालक व मालक हिरेन कानाबार यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी हिरेन कानाबार व त्यांच्या पत्नीच्या ताब्यातील सोन्याच्या तीन अंगठय़ा, लेडीज घडय़ाळ, सोनी कंपनीचा कॅमेरा, अॅपल व ब्लॅकबेरी कंपनीचे दोन मोबाइल, कानातील हिऱ्याच्या रिंगा, रोख २० हजार रुपये असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. हिरेन कानाबार यांच्या फिर्यादीनुसार खालापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३९४- ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अट्टल दरोडेखोरांनी तथा आरोपींनी मागे कोणताही सुगावा ठेवलेला नव्हता. खालापूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एल. तांबे, देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बडाख, साहाय्यक फौजदार श्रीरंग किसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, खालापूरचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक चव्हाण, पो. नि. इरगुंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिताफीने व अथक परिश्रम घेऊन या गुन्ह्य़ाचा तपास लावण्यात अखेर यश संपादन केले. रवी संजय पवार (२४), सचिन राजू पवार (२४), सुनील जोसेफ फेराव (२५) सर्व राहणार- पळसधरी आदिवासी वाडी (ता. कर्जत), अमोल बाबू मुकणे (२३), बारकू रघुनाथ वाघमारे (२४) दोघे रा. मुळगाव आदिवासी वाडी (ता. कर्जत) या संशयित आरोपींना विविध ठिकाणी अटक केली. पोलिसांचा तपासी दणका बसताच, अखेर आरोपींनी गुन्हा कबूल केला. या आरोपींना या गुन्ह्य़ात चोरलेले दागिने पुणे कात्रज येथील सोनार जीवराम बुधाजी चौधरी याला विकले होते. पोलिसांनी ४५ हजारांचे चोरलेले दागिने जीवराम चौधरींकडून हस्तगत केले. चोरीचा माल विकत घेतल्याबद्दल पोलिसांनी जीवराम चौधरी याला भा.दं.वि. कलम ४११ अन्वये या गुन्ह्य़ात गजाआड केले आहे. खालापूर न्यायालयाने या सर्व आरोपींना १७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासाअंती यापूर्वीच्या अनेक दरोडय़ांचा तास लागण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. तांबे अधिक तपास करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा