धाराशिव: भारतीय स्टेट बँकेच्या उमरगा तालुक्यातील बलसूर शाखेशेजारी असलेल्या एटीएम केंद्रातील यंत्रावर दरोडेखोरांनी तीन महिन्यात दुसर्‍यांदा डल्ला मारला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम यंत्र कापून त्यातील आठ लाख २६ लाखांची रोकड लंपास केली आहे. घटनास्थळी यंत्रात लागलेल्या आगीत तीन हजार सहाशे रूपयांच्या नोटाही जळालेल्या स्थितीत सापडल्या आहेत. मागील तीन महिन्यांपूर्वी याच एटीएम यंत्रावर दरोडेखोरांनी डल्ला मारत २६ लाखांची रोकड लांबवली होती. त्या दरोड्याचा तपास लागतो न लागतो तोवर त्याच एटीएम यंत्रावर पुन्हा दरोडा पडला आहे. दरम्यान बँक आणि पोलीस दलाच्या सतर्कतेबद्दल नागरिकांंमधून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तालुक्यातील बलसूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे एटीएम यंत्र आहे. मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम यंत्राचे कॅश वॉलेट गॅस कटरने कापून त्यातील रक्कम काढताना दोन ट्रेमधील जवळपास आठ लाख २६ हजार शंभर रुपये रक्कम त्यांच्या हाती लागली. चोरट्यांनी हा प्रकार सुरू केल्यानंतर एटीएम यंत्रात अचानक लाग लागली. या आगीत  वेगवेगळ्या नोटा असलेल्या तीन हजार सहाशे रुपयांची रोकड जळालेल्या स्थितीत आढळून आली आहे. शिल्लक रक्कमेची अधिक माहिती मिळू शकली नाही. या घटनेसंदर्भात रात्री एक वाजून ५२ मिनिटाला ११२ डायल क्रमांकावरुन पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उमरग्याचे पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड, बीट अंमलदार वाल्मिक कोळी, विष्णू मुंडे आदी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेंव्हा एटीएम यंत्र जळत होते. पोलीस व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमोल अरूण पवार (रा. बाळे सोलापूर) यांच्या तक्रारीनुसार अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड हे घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

हेही वाचा >>>ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, “वंचितचा समावेश अद्याप ‘मविआ’त नाही, भाजपा व संघविचारसरणी विरोधात…”

दुसर्‍या वेळीही दरोड्याची पद्धत सारखीच!

साधारणतः तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणची एटीएम यंत्र फोडून चोरट्यांनी २६ लाख ८८ हजाराची रोकड पळविली होती. या घटनेचा तपास आणखी उजेडात येण्याअगोदर चोरट्यांनी मंगळवारी रात्री दुसर्‍यांदा एटीएम यंत्र फोडले. अगदी क्षणाक्षणाचे नियोजन करून चोरट्यांनी चोरीचे धाडस केले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद न होण्याची सावधगिरी बाळगत सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचे स्प्रे मारण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली असून त्या दिशेने तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery at atm center of state bank of india in umarga taluka amy