अलिबाग – रोहा शस्त्रसाठा आणि वन्यजीव शिकार प्रकरणात रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ठासणीची बंदूकही जप्त केली आहे. लक्ष्मण जानू हीलम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे रोह्यातील धनगर आळी येथे धाड टाकून मोठा शस्त्रसाठा आणि वन्यजिवांचे अवशेष जप्त केले होते. या प्रकरणी तन्मय भोगटे या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून रिव्हॉलर, बारा बोर बंदुके, चाकू, तलवारी, जिवंत काडतुसे, बंदूक बनविण्याचे साहित्य, विविध प्राण्यांची शिंगे व इतर शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला होता.
हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत अवजड वाहतूक बंदी
या प्रकरणी रोहा पोलीस ठाणे भारतीय हत्यार कायदा आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ आंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे या प्रकरणाचा तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या तन्मय भोगटे याने बनवलेली बंदूक काही जणांना विकल्याचे तपासादरम्यान समोर आले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई करत तारणे आदिवासी वाडी तळा येथून, लक्ष्मण जानू हीलम याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक ठासणीची बंदूकही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.