Rohini Khadse On MNS Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे. या याचिकेच मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत, असं म्हटलं आहे. यावरून मनसेचे नेते आक्रमक झाले असून यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत याचिका दाखल करण्यात आल्याच्या मुद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. ‘मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे ‘महाशक्ती’ तर नाही ना?’ अशी शंका रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रोहिणी खडसे काय म्हणाल्या?

“कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावडं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?”, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केलं होतं. तसेच राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना (पक्ष कार्यकर्त्यांना) दिले होते. त्यानुसार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. काही वेळा हिंसक आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी मराठीला विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या कानशीलात लगावल्या. मनसेच्या या आंदोलनानंतर उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे त्यांनी केली आहे. “राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी”, असं शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.