Rohini Khadse Niece Molestation Case : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या काही मैत्रिणींची मुक्ताईनगर येथील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोरांनी छेड काढल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेनंतर रक्षा खडसे यांची भावजय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्याचं गृहखातं व पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, “आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. जळगावातील कोथळी या गावी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. आदिशक्ती संत मुक्ताई यात्रेत हा प्रकार घडला होता. परंतु, दोन दिवसांनंतरही याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती”.

रोहिणी खडसे म्हणाल्या, “रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबर जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी छेडछाडीच्या घटनेनंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रारीची दखल घेऊन त्या गुंडांवर, टवाळखोर तरुणांवर कारवाई मात्र झाली नाही. कोणालाही अटक झाली नाही. त्यामुळे माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकच प्रश्न आहे की एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबाबत असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील महिला, भगिनींना न्याय कसा मिळणार?”

गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम का केलं जातंय? रोहिणी खडसेंचा प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणाल्या, “केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून कारवाईची मागणी करावी लागली. या प्रकरणात आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळाली की महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्याचा गृहखातं अपयशी ठरलं आहे. पोलीस यंत्रणा नेमक्या कोणाच्या दबावात आहे? गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम का केलं जातंय? पोलीस या गुंडांना पाठीशी का घालत आहेत? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? आमच्या भाचीची छेड काढणारे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे होते? कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते होते? ज्यांच्यासाठी राजकीय दबाव वापरून कारवाई होऊ दिली नाही त्यांना सरकार पाठीशी का घालतंय? मतदारसंघात कशा वातावरणात आम्ही राहतोय ते देवेंद्र फडणवीस यांनी पहावं”.

“…तर सर्वसामान्य मुलींची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याची हिंमत होईल का?”

रोहिणी खडसे म्हणाल्या, “केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते आणि तक्रारीनंतर दोन दिवस कारवाई होत नाही, असं होत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलींची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायची हिंमत होईल का? पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. पोलीस नेमक्या कोणाच्या दबावात आहेत याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. ज्यांनी या गुंडांना पाठीशी घातलं त्यांच्यावर कारवाई होणार का याचं देखील उत्तर आम्हाला मिळायला हवं. या गुन्हेगारांना, गुंडांना संरक्षण का दिले जातंय, तसेच गुंडांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांवर कारवाई का होत नाही याचं उत्तरही गृहखात्याने आम्हाला द्यावं”.

Story img Loader