Rohini Khadse Niece Harassment Case : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या काही मैत्रिणींची मुक्ताईनगर येथील मुक्ताई यात्रेत काही समाजकंटक तरुणांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दोन दिवसांत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. परिणामी रक्षा खडसे यांनाच पोलीस ठाणं गाठावं लागलं. त्यानंतर या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रसारमाध्यमांसमोर कारवाईबाबतची माहिती दिली. दरम्यान, रक्षा खडसे यांची भावजय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी गृहमंत्री व पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, “ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई का केली नाही? पोलीस नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?”
रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुक्ताईनगर येथे विशिष्ट पक्षाच्या गुन्हेगार कार्यकर्त्यांनी मुलींची छेड काढल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आणि पोलिसांना कारवाईचे आदेश दिले त्याबद्दल धन्यवाद. सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांवर कारवाई करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतांना लाडक्या बहिणी, महिला व मुलींना एक सुरक्षित वातावरण लाडका भाऊ म्हणून आपण देणार अशी माझी खात्री आहे”.
गुंडांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होणार का? रोहिणी खडसेंचा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणाल्या, “केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते आणि तक्रारीनंतर दोन दिवस कारवाई होत नाही, असं होत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलींची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणअयाची हिंमत होईल का? पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. पोलीस नेमक्या कोणाच्या दबावात आहेत याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. गृहखात्याने आम्हाला उत्तर द्यावं. ज्या लोकांनी या गुंडांना पाठीशी घातलं त्यांच्यावर कारवाई होणार का याचं देखील उत्तर आम्हाला गृहमंत्र्यांनी द्यावं. या गुन्हेगारांना, गुंडांना संरक्षण का दिले जातंय? तसेच गुंडांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांवर कारवाई का होत नाही याचं उत्तरही आम्हाला मिळायला हवं”.