टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १७ गावांचा समावेश करावा या आणि इतर मागण्यांसाठी आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. परंतु, उपोषणाला सुरुवात होण्याआधीच सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. या योजनेसाठी ताईंनी काय प्रयत्न केला असा प्रश्न असेल तर त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि पुरावे घेऊन जावेत. ही मागणी करत असताना खरंतर या व्यासपीठावर मी काय भाषण करणार याची सर्वांना प्रतिक्षा आहे. परंतु, पाण्यामध्ये राजकारण न करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. कोणावरही आरोप न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या दिवशी सुप्रिमो मंजूर होईल, त्या दिवशी निश्चितपणे असा इतिहास घडवू, जो इतिहास तुम्ही आबांचा काढणार होता, तो इतिहास आम्ही तुमचा काढल्याशिवाय राहणार नाही”, असं रोहित पाटील म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमन पाटील यांनी आज उपोषणाचा इशारा दिला होता. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या बेमुदत उपोषण करणार होत्या. परंतु, त्याआधीच टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. परंतु, टेंभू योजनेच्या अहवालाला तृतीय सुधारीत मान्यता मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका सुमन पाटील यांनी घेतली आहे.