Rohit Patil On Viral Photo With Sharad Pawar : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. एककडी महायुतीने तब्बल २३५ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीच्या वाट्याला ४९ जागा आल्या. दरम्यान लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवत ८ जागी विजय मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या ८६ जागांपैकी १० जागांवरच विजय मिळवता आला. या दहा जागांमध्ये तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातील आमदार रोहित पाटील यांचाही समावेश आहे. याचबरोबर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे आमदार म्हणून विजयी होणार सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.
दरम्यान रोहित पाटील यांनी आज एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांचा व्हायरल झालेल्या फोटोमागील रहस्य उलगडले आहे. तासगावमधील प्रचारसभा संपल्यानंतर शरद पवार यांनी हेलिपॅडवर रोहित पवार यांना जवळ घेत त्यांच्या कानात काहीतरी सांगितले होते. याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी या फोटोची राज्यभरात चर्चा झाली होती.
काय म्हणाले रोहित पाटील?
एबीपी माझाच्या माझा कट्टा या मुलाखतीच्या कार्यक्रमात रोहित पाटील यांना, शरद पवार यांच्याबरोबर व्हायरल झालेल्या फोटोबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा रोहित पाटील म्हणाले, “निवडणुकीच्या काळात कोणती काळजी घ्यायची याबाबत साहेबांनी मला ४ ते ५ वेळा फोन केला होता. साहेबांनी मला सांगितले होते की, ते २७ वर्षांचे असताना त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधातही त्यांच्या मतदारसंघातील विरोधक एकटावले होते. माझ्याबाबतीतही अशीच परिस्थिती असल्याने, साहेबांना काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी मी केलेली कामे लोकांसमोर कशा पद्धतीने मांडायची आणि काय चुका करायच्या नाहीत हे सांगितले.”
माजी खासदाराला केले पराभूत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांनी उमेदवारी दिली होती. अवघ्या २५ वर्षांच्या असणाऱ्या रोहित यांच्यासमोर सांगलीचे दोन वेळचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे आव्हान होते. याचबरोबर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीही रोहित पाटील यांच्याविरोधात संजक काका पाटील यांना ताकद दिली होती. अशा परिस्थितीतही रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांचा तब्बल २७,६४४ मतांनी पराभव केला.