मराठा आरक्षण आणि ओबीसी समुदायाच्या राजकीय आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षण किंवा ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देत असताना भाजपाकडून मोठी भाषणं दिली जातात. मात्र, त्यानंतर संबंधित समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी भाजपाचेच पदाधिकारी न्यायालयात जातात, असा आरोप रोहित पवार यांनी केला. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी रोहित पवार म्हणाले, “जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा भाजपाचे काही पदाधिकारी म्हणजेच गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेले. त्याचबरोबर जेव्हा आम्ही ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाजपाचेच पदाधिकारी ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं नाही पाहिजे, यासाठी न्यायालयात गेले.”
हेही वाचा- सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…”
“लोकांसमोर गोड बोलायचं, मोठं-मोठी राजकीय भाषणं द्यायची. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण देऊ, धनगर आरक्षण देऊ, अशी आश्वासनं द्यायची. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. नेत्यांकडून भाषणात ‘ट्रिपल इंजिन’, चौथं इंजिनबाबत बोललं जातं. पण जेव्हा हक्क देण्याची वेळ येते, तेव्हा सर्व न्यायालयावर ढकलून मोकळं व्हायचं. अशा पद्धतीने भाजपा काम करते”, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
हेही वाचा- “एका बड्या नेत्याचं…”, ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका
“भाजपाचे कार्यकर्तेच संबंधित प्रकरणं न्यायालयात घेऊन जातात. भाजपा ज्या पद्धतीने काम करतं आहे, हे आता लोकांना कळालं आहे. भाजपाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, हे लोकांना कळून चुकलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात उतरेल आणि भाजपा सत्तेतून पायउतार होईल, असं आम्हाला वाटतं”, असा दावाही रोहित पवार यांनी केला.