देशात खतांच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका बाजूला पावसाने हुलकावणी दिली आहे तर दुसऱ्या बाजूला खतांसह बियाणांच्या किंमतींनी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या मुद्द्यावर विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरकारकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी बोगस बियाणांच्या संदर्भात किती जणांवर कारवाई केली? याबाबतची माहिती सरकारकडे मागितली. तसेच खतांच्या वाढत्या किंमतींच्या मुद्यावरुन देखील सरकारला धारेवर धरलं.
दरम्यान, खतांच्या मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत सरकारला धारेवर धरत असताना खतांच्या पिशव्यांवरून केल्या जाणाऱ्या भाजपाच्या जाहिरातीवरून आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या खतांच्या पिशव्यांवर भाजपाची जाहिरात केली जात असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात यूरिया खताची पिशवी दिसत आहे, ज्यावर ठळक अक्षरात भाजप (भारतीय जनउर्वरक परियोजना) लिहिल्याचं दिसतंय. यावरून आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरवाढीचं कारण देत केंद्र सरकार खतांच्या किंमती भरमसाठ वाढवतं. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती कमी झाल्यानंतरही देशांतर्गत खतांच्या किंमती मात्र कमी न करता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून नफेखोरी करतंय. त्याचबरोबर आता तर खतांच्या पिशवीवर ‘भाजप’ हे नाव छापून शेतकऱ्यांच्या जीवावर फुकटात जाहिरातबाजी सुरू आहे. हा संतापजनक प्रकार सगळीकडे सुरू आहे. केंद्र सरकारला चमकोगिरीची फारस हौस असेल तर या जाहिरातीचे पैसे भाजपाकडून वसूल करावेत.