राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. रोहित पवार यांना अहमदनगरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे. यावर रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवार म्हणाले, मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. मी केवळ विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि कर्जत-जामखेडमधूनच निवडणूक लढणार आहे. मला दिल्लीला जाण्यात रस नाही, असंही त्यांनी सांगितलं. रोहित पवार अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अहमदनगरमध्ये आलेल्या रोहित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढणार आहात का? किंवा पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढायला तयार आहात का? यावर रोहित पवार म्हणाले, मला दिल्लीला जायचं नाही. मला महाराष्ट्राच्या विधीमंडळातच काम करायचं आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, मी या कर्जत-जामखेड मतदारसंघातूनच लढणार आहे. अनेक लोक चर्चा करत आहेत. परंतु, तसं होणार नाही. मी फक्त आणि फक्त कर्जत-जामखेडमधूनच निवडणूक लढणार आहे. कर्जत जामखेडच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला आहे. संघर्षाच्या काळात इथले लोक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. या लोकांमुळेच मला राज्यात ओळख मिळाली आहे.
हे ही वाचा >> “कारखाने यांचे, रिकव्हरी तपासणारेही हेच, मग…”, साखर कारखान्यांच्या ऑडिटवरून राजू शेट्टींचा शरद पवारांना टोला
रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघातील लोकांना मी माझं कुटुंब मानतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी विधानसभेचा हा मतदारसंघ सोडणार नाही आणि दिल्लीला जाणार नाही. तसेच अहमदनगर लोकसभेला आपल्या विचाराचा, अपल्या संघटनेचा, आपल्या पक्षाचा आणि आपल्या इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला ताकद द्यावी लागेल.