राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार यांच्या गटातले आमदार रोहित पवार हे भाजपा आणि अजित पवारांच्या गटातल्या नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांपासून ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांपर्यंत अनेकांवर जोरदार हल्लाबोल केला. मंत्री छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देणार असल्याचं जाहीर आव्हान दिलं होतं. त्यावर रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात एकत्र ताकद लावणार की वेगवेगळे लावणार आहात?

रोहित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, तुम्हाला बारामती विधानसभेतून उमेदवारी दिली तर तुम्ही अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? त्यावर रोहित पवार म्हणाले, मला उमेदवारी दिली तरी मी बारामतीतून निवडणूक लढणार नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही बारामती विधानसभेची जागा लढवणार नाही. राज्यातले लोक नाराज आहेत, बारामतीसुद्धा नाराज आहे. परंतु विधानसभेचा विषय येईल तेव्हा बारामतीतले मतदार अजित पवार यांनाच मत देतील.

हे ही वाचा >> “गोपीनाथ मुंडेंचं कुटुंब फोडलंत, धनंजयला तुम्ही…”, छगन भुजबळांचा शरद पवारांवर आरोप

दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रोहित पवार यांना विचारलं की, लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पार्थ पवार असा सामना रंगेल का? यावर रोहित पवार म्हणाले, नाही रंगणार. मी तुम्हाला विधानसभेचं पण आत्ताच सांगतो, बारामतीच्या विधानसभेत फक्त आणि फक्त अजितदादाच जिंकू शकतात. बाकी कुणीच तिथं जिंकू शकत नाही. राहिला प्रश्न लोकसभेचा तर बारामतीची जनता ही हुशार आहे.

Story img Loader