Rohit Pawar vs Gulabrao Patil : पुरेशा पटसंख्येअभावी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याची वेळ आलेली आहे. अशा स्थितीत, “शिक्षकांनी नुसते हातावर हात धरून बसून राहू नये. आम्ही राजकारणी जसे पक्ष फोडतो, तसेच तुम्हीही दुसऱ्या शाळांमधील विद्यार्थी फोडा आणि शाळा चालवा”, असा अजब सल्ला राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना दिला आहे.

गुलाबराव पाटलांच्या या सल्ल्यामुळे त्यांच्यावर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून पाटलांना टोला लगावला आहे. सरकार आता विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्या मागे देखील ईडी, सीबीआय आणि आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावणार का? असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना चिमटा

रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री गुलाबराव पाटील सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि आयकर विभागाच्या (आयटी) चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय. मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारावी. असं केल्यास शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील.

जळगावात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमातंर्गत तालुकास्तरावरील विजेत्या शाळांना शनिवारी (१२ एप्रिल) पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. जळगाव ग्रामीण विघाताली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या एकूण ४५ हजार विद्यार्थी आहेत, त्यामध्ये अलीकडच्या काळात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. अनेक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याविषयी या कार्यक्रमात चिंता व्यक्त करताना पालकमंत्री पाटील यांनी शिक्षकांना दुसऱ्या शाळांमधील, प्रामुख्याने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी पळवून पटसंख्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

गुलाबराव म्हणाले होते, “आता आपल्याला देखील बदलण्याची गरज आहे. माझ्या स्वतःच्या दोन शाळा आहेत. माझ्या शाळेतील शिक्षक परवापासून विद्यार्थी जमा करण्यासाठी (संख्या वाढवण्यासाठी) कामाला लागले आहेत. आम्ही जसं पक्षाचे लोक, आमदार फोडतो, तसं तुम्ही (इंग्रजी शाळेचे) विद्यार्थी फोडले पाहिजेत”,