एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर गुन्हा दाखल झालेल्या दोघाचं नाव गुणवत्ता यादीत आल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीचा मुद्दा मांडला. पण, फडणवीसांनी त्या मुद्द्याकडं दुर्लक्ष केलं आणि पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एमपीएससीमार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध अराजपत्रित गट ‘ब’ व गट‘क’ संवर्गातील पदभरतीकरीता रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा नवी मुंबईसह महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली.
परीक्षेला बसलेला जालना येथील उमेदवार आकाश भाऊसिंग घुनावत (वय २७) याने हडपसर पुणे येथील जेएसपीएम जयवंतराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्पाय कॅमेऱ्याद्वारे जीवन नायमाने या व्यक्तीला पाठविली होती. त्यानंतर जीवन नायमाने याने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शंकर जारवाल याच्या मोबाईलवर पाठवली. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, नायमाने आणि घुनावतचे नाव गुणवत्ता यादीत असल्याचं समोर आलं आहे. याचा फोटोही रोहित पवार यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर शेअर केला आहे.
‘एक्स’ अकाउंटवर रोहित पवार म्हणाले, “आदरणीय फडणवीस साहेब, पावसाळी अधिवेशन सुरू असताना पेपरफुटीचा मुद्दा मांडला होतं. पण, आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. आणि पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती.”
हेही वाचा : “शहाण्याला शब्दांचा मार, सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली, पण…”, ठाकरे गटातील खासदाराची नार्वेकरांवर टीका
“एका चुकीचे परिणाम प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत”
“आपल्या त्याच चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक परिक्षेत या टोळ्या पेपर फोडायला लागल्या. आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच मंत्रालयातून त्यांना सोडण्यासाठी फोन जातात. आपल्या त्या एका चुकीचे परिणाम राज्यातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.
“गुणवत्ता यादीतही पेपर फोडणाऱ्यांची नावे”
“आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची हिंमत इतकी वाढलीय की ते एमपीएसीचे पेपर फोडायला लागले आहेत. त्यांची नावे गुणवत्ता यादीतही यायला लागली आहेत. यासाठी पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांना जबाबदार धरायचे की त्यांना अभय देणाऱ्या सरकारला?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : शेतकऱ्याचा बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…
“पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणा”
“शासनाने थोडा गंभीरपणे विचार करावा. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातही पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणा. जेणेकरुन पेपर फोडण्याची कोणाची हिंमत होणार नाही,” असेही रोहित पवार म्हणाले आहेत.