जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. यावरून सकल मराठा समाजासह विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. मात्र, सोमवारी ( ४ सप्टेंबर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जखमींची माफी मागितली आहे. बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झालेत, त्यांची क्षमा मागतो, असं फडणवीसांनी म्हटलं. यावरून आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“माझ्या आधीच्या सत्तेच्या काळात पाच हजार आंदोलनं झाली. तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जे जखमी झालेत, त्यांची मी क्षमा मागतो. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या घटनेचं राजकारण होणं योग्य नाही. काही नेत्यांनी तो प्रयत्न केला. लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले, असे चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आले,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

हेही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटं बोलण्यात वस्ताद! हे सारं दुतोंड्यांचं…”, जालना लाठीमार प्रकरणी ठाकरे गट आक्रमक

“…तर राजीनामा द्यावा”

यावर रोहित पवार म्हणाले, “आपल्याकडून एखादी गोष्ट झाल्यावर ती स्विकारतो आणि मग माफी मागतो. तुम्ही ती गोष्ट स्विकारत आहात. तर, त्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. सरकारमध्ये असलेल्यांनी त्याचा विचारा करावा.”

हेही वाचा : “…अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही”, जालन्यातून बच्चू कडूंचा इशारा

“‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम बंद करावा”

दरम्यान, रोहित पवार यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरून सरकारवर टीका केली आहे. “शासन सामान्य लोकांच्या घरापर्यंत योजना पोहचवण्यासाठी असतं. पण, यांना शक्तीप्रदर्शन आणि राजकीय भाषण करायचं आहे. यासाठी सरकारच्या पैशांचा वापर केला जातोय. हा कार्यक्रम अतिशय चुकीचा आहे. लोकांना लाभ मिळत नाही. मात्र, मनस्ताप खूप होतो आहे. सरकारने हा कार्यक्रम बंद केला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवारांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar attacks devendra fadnavis say sorry over jalna maratha protester lathi charge ssa
Show comments