अजित पवारांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. इतकंच नाही, तर मुंबईत घेतलेल्या समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला. यावेळी अजित पवारांनी अनेक गंभीर आरोप केले. आता याच आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे.
रोहित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर मुंबईत बंडखोरांची जी बैठक झाली आणि भाषणं झाली. त्यात शरद पवारांवर ज्यापद्धतीने बोललं गेलं त्यामुळे त्या कार्यक्रमाला गेलेले आमदार आणि पदाधिकारीही भावनिक झाले. त्यांची आपण चूक केली की काय अशी भावना झाली.”
“तिकडे गेलेल्या आमदारांमध्येही शरद पवारांविषयी एक भावना”
“शरद पवारांवर विश्वास ठेऊन जे आमदार या बाजूला आलेले आहेत ते आपआपल्या मतदारसंघात काम करत आहेत. या गटातील आमदारांमध्येच नाही, तर तिकडे गेलेल्या आमदारांमध्येही शरद पवारांविषयी एक भावना आहे,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण, शरद पवारांचं तीन शब्दात उत्तर, म्हणाले…
व्हिडीओ पाहा :
“त्या गटातील काही आमदारांवर दबाव”
रोहित पवार पुढे म्हणाले, “त्या गटातील आमदारांना एका बसमध्ये बसवून हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे त्या गटातील काही आमदारांवर दबावही आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे जेव्हा शरद पवारांवर बोललं गेलं तेव्हा सर्वच लोक भावनिक झाले.”
हेही वाचा : दिल्लीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक, निलंबनासह ‘हे’ ८ ठराव
“लोकांना शरद पवारांवर बोलल्याने वाईट वाटणं महत्त्वाचं”
“सत्ता त्यांची आहे. त्यामुळे काही प्रमाणात दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लोकांना शरद पवारांवर बोलल्याने वाईट वाटणं, ती जाणीव होणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळेच काही लोक आमच्याबरोबर परत आले,” असंही रोहित पवारांनी नमूद केलं.