महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशात बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे. सीमावादाच्या प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीकास्र सोडले. तसेच रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असा प्रश्नही रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – आता संसदेतही गाजणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट होणार आक्रमक

काय म्हणाले रोहित पवार?

“वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?” असा थेट प्रश्न रोहित पवार यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. तसेच मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्यावरून त्यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. “पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?” असे ते म्हणाले.

“महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू…करू… केंद्राशी बोलू…ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे दिली.

हेही वाचा – “…म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं”, संजय राऊतांचं मोठं विधान, शिंदे सरकारला केलं लक्ष्य!

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला

दरम्यान, मंगळवारी दुपारी बेळगावजवळील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी एकूण सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक करत करण्यात आली. या हल्ल्याचा राजकीय पक्षांसह महाराष्ट्र सरकारकडूनही निषेध करण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar critcized cm eknath shinde on maharashtra karnatak border issue spb