राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन ते तेथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत जाहीर सभाही घेत आहेत. येवला, बीड येथील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार आता २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावरून जनतेला संबोधित करणार आहेत. त्यांच्या या सभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे..
“शरद पवारांनी मुद्दाम दसरा चौक मैदान सभेसाठी निवडलं आहे. पुरोगामी विचार, शिव, शाहू आंबेडकरांचा विचार आणि विचारांची ताकद पवारांना अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवायची आहे म्हणून पवारांनी ते मैदान निवडलं आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा >> “आम्ही आमचाच टेंभा मिरवतोय, असं…”, शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
“शरद पवार यांच्यासोबत जे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत त्यांची आज ताकद आहे. ज्यांना सत्तेत राहायचे होते तेच सत्तेत गेले, पण खरे कार्यकर्ते पवारांसोबत राहिले. कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानात जागा अपुरी पडेल एवढीच भिती आहे”, असंही ते म्हणाले.
“जेव्हा आपण एखाद्या जिल्ह्यासाठी नेत्यावर अवलंबून राहतो तेव्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नेतेच करत असतात. या प्रक्रियेत खरे कार्यकर्ते, पदाधिकारी जे लोकांमध्ये असतात, ताकदीचे असतात ते मागे राहतात. पण काहीजण साहेबांवर प्रेम करत असल्याने ते पक्षातच राहतात. माझ्याबरोबर जे पदाधिकारी आहेत ते विचारांनी भक्कमपणे माझ्यासोबत राहिलेले आहेत. पण कुठेतरी यांच्यावरही अन्याय होतोय असं वाटत होतं. पवारांनी भूमिका घेतल्याने दुसऱ्या फळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची ताकद असल्याने काही अडचण येईल असं वाटत नाही. काही जिल्ह्यात कार्यकर्ते मोकळा श्वास घेत असल्याची परिस्थिती आहे”, असंही रोहित पवार म्हणाले.