Rohit Pawar : आज महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो आहे. राज्यात गुंडांचे राज्य आलं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस शांतपणे बसलं आहेत, याला काय म्हणायचं? हेच देवेंद्र फडणवीसांचे कर्तृत्व आहे का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. आज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे शरद पवार गटाच्यावतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी बोलताना रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीक केली.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते, पण मला देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास बघायचा आहे. त्यांचं कर्तृत्व काय? त्यांनी कुटुंब फोडलं, पक्ष फोडले. जेव्हा थोर व्यक्तींवर बोलल्या गेलं, तेव्हा ते शांत होते, जेव्हा तुकाराम महाराजांच्या विरोधात बोललं गेलं, तेव्हाही ते शांत होते. आज राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो आहे, तेव्हा ते शांत आहेत, राज्यात आज गुंडांचे राज्य आलं आहे, पण ते शांत आहेत, मग याला काय म्हणायचं? हेच तुमचं कर्तृत्व आहे का? लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील”, अशी टीका रोहीत पवार यांनी केली.
पंतप्रधान मोदींवर केली टीका
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्र सोडलं. “लोकसभा निडवणुकीच्या काळात दिल्लीचे बादशहा महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी ते शरद पवार यांच्याबाबत खूप काही बोलले. त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटलं. मला त्यांना सांगायाचं आहे की लोकसभेच्या निकालाने जनतेने तुम्हाला दाखवून दिलं आहे, की शरद पवार हे भटकती आत्मा नसून ते राज्यातल्या स्वाभिमानी आणि महाराष्ट्र धर्म ठिकवणाऱ्या लोकांची आत्मा आहे”, असे रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांनाही केलं लक्ष्य
रोहित पवार यांनी अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. “केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं. मात्र, त्यावर राज्यातले नेते काहीही बोलत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले की केंद्र सरकारने कांद्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा होता, पण खरं तर अजित पवार हे सत्तेत आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असता, तर त्यांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते”, अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.
© IE Online Media Services (P) Ltd