Rohit Pawar : पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील ६ वर्षांच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रांबरोबर फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याचं पुढे आलं आहे. या घटनानंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. यावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनांवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “बोपदेव घाटात घडलेली सामुहिक अत्याचाराची घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. शाळा, कॉलेजे, रस्ते, हॉस्पिटल्स काहीही आज सुरक्षित राहिलेले नाहीत, परिणामी महाराष्ट्रात कधी नव्हती एवढी असुरक्षेची भावना आज पसरली आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा – पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, मार्केटयार्ड परिसरात चौघांकडून कोयत्याने वार; उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू

महिलांवरील अत्याचारावरून राज्य सरकारवर केली टीका

पुढे बोलताना त्यांनी या घटनांवरून राज्य सरकारलाही लक्ष्य केलं. “राज्यात कायदा-सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर पोहचली आहे. पण राज्याचे गृहमंत्री मात्र धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन महिला सुरक्षेच्या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत. एकीकडे महिला सन्मानाच्या गोल गोल गप्पा करायच्या आणि दुसरीकडे मात्र शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात काहीच करायचं नाही, ही दुटप्पी भूमिका योग्य नाही”, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

सुप्रिया सुळे यांनीही व्यक्त केला संताप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावरून संताप व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली आहे. “बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही, असं म्हणावं लागत आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच शासनाने या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी”, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा – Pune Crime : “पुण्यात विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराची घटना भयंकर, शाळा प्रशासन..”, सुशीबेन शाह यांनी काय म्हटलंय?

नेमकं प्रकरण काय?

कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रांबरोबर फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी मूळची परराज्यातील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले.