माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधील एका प्रचारसभेत बोलताना केले होते. या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत, असं ते म्हणाले. एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “ही किती मोठी शोकांतिका आहे, एक ठाकरे…”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!…

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

“खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल. आज ते ज्याला ईश्वराचा आशीर्वाद म्हणत आहेत, तो ईश्वाराचा आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत”, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस तुम्ही कुणाला येडं बनवता? अस म्हणत ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, रविवारी अकलूजमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी विश्वासघात केला, तर देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. “मी कोणाच्या वाट्याला जात नाही. कोणाचं वाईट चिंतत नाही आणि कोणाला त्रासही देत नाही. माझ्यावर ईश्वराचा आशिर्वाद आहे. आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे. पांडुरंगांचा आशिर्वाद आहे, पण कोणी माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडतच नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Story img Loader