राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या दर्जावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरूनच शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार शिंद सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच सभागृहात गणवेश दाखवताना “रोहित क्वालिटी बघ” असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी? असा प्रश्नही रोहित पवार यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर एका विद्यार्थ्याचा शालेय गणवेशातील फोटो शेअर करत शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री साहेब आठवतंय का? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता, तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते, पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा – “बालिश व्यक्तीने अजित पवार यांच्याबद्दल बोलणं म्हणजे…”; रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला आमदार अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर!

सभागृहात गणवेश दाखवताना “रोहित क्वालिटी बघ” असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी? हा प्रश्न पडतो. तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेलच, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

शालेय गणवेशावरून अंबादास दानवेंचीही शिंदे सरकारवर टीका

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. या चिमुकल्याने घातलेला गणवेश महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब आहे, पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला लावण्यात आली आहे. हा विद्यार्थ्यांची चेष्टा करण्याचा प्रकार आहे. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, परंतू सरकारने त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा – Karjat Jamkhed Assembly Constituency: कर्जत-जामखेड विधानसभा; काका-पुतण्याच्या संघर्षाचा नवा आखाडा! यंदा आमदार कोण, राम शिंदे की रोहित पवार?

पुढे बोलताना, १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar criticized eknath shinde govt over student school uniform spb