उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ४ आणि ५ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी विविध उद्योजकांची भेट घेतली. तसेच या उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली. महत्त्वाचे याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी डावोसला जाणार असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा – योगी आदित्यनाथ मुंबईत आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले, बड्या उद्योगपतींनी दिली आश्वासनं!
काय म्हणाले रोहित पवार?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले. पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी, असं आपल्या सरकारला वाटलं नाही? अशी टीका रोहित पवार यांनी केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या डावोस दौऱ्यावरूनही टोला लगावला, याला ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात’, असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणुकीचे उद्योजकांचे आश्वासन
फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये उद्योजकांना सहभागी होण्याचे निमंत्रित देण्यासाठी योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह टाटा सन्स, अदानी समूह, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांनी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली होती.