जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन आणखी तीव्र केलं. तसेच जरांगे उपोषणाला बसलेले असताना त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळाला. परिणामी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची आणि मागण्यांची दखल घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह लाठीहल्ल्याच्या दिवशी झालेल्या अनागोंदीनंतर ज्या नागरिकांवर, आंदोलकांवर कारवाई सुरू करण्यात आली ती थांबवण्याची, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. राज्य सरकारनेही ही मागणी मान्य केली होती. परंतु, दोन दिवसांपूर्वी अंतरवालीत तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज जालन्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, अंतरवालीतल्या लाठीहल्ल्यानंतर बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. परंतु, यासाठी बाहेरून लोक आले होते. या व्यावसायिक टोळ्यांनी (पैसे घेऊन गुन्हे करणारे) बीडमध्ये दगडफेक केली, जाळपोळ केली. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि फॉस्फरस बॉम्ब टाकले. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. परंतु, तिथे जमलेले इतर लोक, ज्यांनी या व्यावसायिक गुडांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दडगफेक, जाळपोळ करण्यासाठी मास्क घालून आलेल्या लोकांवर कारवाई झाली नाही. ते कोण होते हे अद्याप कळू शकलेलं नाही. असाच प्रकार अंतरवालीत सुरू आहे.
हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांचा ओबीसी नेत्यांना इशारा, छगन भुजबळ म्हणाले, “मी त्यांना सांगू इच्छितो की…”
अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीहल्ल्याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, मुळात लाठीहल्ला करण्याचे आदेश देणारा फोन पोलिसांना कोणी केला होता? कोणाच्या फोननंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला? हे सांगण्याची गरज आहे. याची चौकशी चालू आहे, एवढंच सांगितलं जात आहे. खरंतर त्याची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी.