Rohit Pawar On Dhananjay Munde: गेल्या डिसेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड या जवळच्या सहकाऱ्याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेले मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुंडें यांच्या राजीनाम्याबाबत माहिती देतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुडेंचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची मागणी केली आहे.

त्यांना सहआरोपी करून…

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार म्हणाले, “मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सामान्य लोकांच्या मनातील संतापाच्या उद्रेकाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे. पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची आणि सुधारित चार्जशीट दाखल करण्याची गरज आहे. तरच संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू!”

Rohit Pawar Post
आमदार रोहित पवार यांची पोस्ट. (Photo- Rohit Pawar, Social Media)

राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भगिनी आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती.”

धनंजय मुंडेंची पोस्ट

दरम्यान धनंजय मुंडे यांनीही, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनाम दिल्याची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली. आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे सोपवलाला आहे.”

Story img Loader