महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेत तत्कालीन संचालक मंडळानं चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. त्याविरोधात समाजसेवक अण्णा हजारे आणि काहीजण न्यायालयात गेले होते. त्यावरून आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीनं कारवाई केली. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. तरीही, ईडीला सर्व माहिती दिली आहे. अधिकारी त्यांचं काम करत आहेत. आम्ही चुकीच्या गोष्टी न केल्यानं घाबरत नाही. ईडीला सहकार्य करण्याची भूमिका आज होती, आताही आहे, उद्याही राहिल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवारांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, “माझी चौकशी सुरू असताना शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात १० ते ११ तास बसून होते. शरद पवार कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात. त्यामुळे महाराष्ट्रात जसं लढत होतो, तसं आज आणि उद्याही लढणार आहे.”

“शरद पवार मार्गदर्शक आणि प्रमुख म्हणून…”

“राजकीय वासरा हा विषय ठरवून होत नसतो. लोक राजकीय वारसा ठरवतात. शरद पवार मार्गदर्शक आणि प्रमुख म्हणून कार्यालयात उपस्थित होते. चौकशी सुरू असताना शरद पवार चिंतेत होते, पण तरीही तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पाठबळ देत होते,” असं रोहित पवारांनी सांगितलं.

“सत्ताधारी गुजरातचा विकास करत आहेत”

“काहीजण बाजू बदलून सत्तेत का गेले? हे त्यांना विचारा. आम्ही पळून जाणारे नाही आहोत, लढणारे आहोत. मराठी माणसं पळून जात नाही, ते लढतात. महाराष्ट्राऐवजी गुजरातचा विकास सत्तेतील लोक करत आहेत,” अशी टीका रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar ed inquiry and sharad pawar shinde fadnavis and ajit pawar ssa