लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुरळा उडाला आहे. अशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणं ही बाब काही नवी नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे. एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत रोहित पवार यांनी सुनील तटकरेंना प्रश्न विचारला आहे.
अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळते आहे. रोहित पवार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते अशी टीका सुनील तटकरेंनी केली होती. आता या टीकेला रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय आहे रोहित पवारांची पोस्ट?
“तटकरे साहेब तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांशी गद्दारी करणारा मी नाही.. भाजपमध्ये जायचंच असतं तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो.. आता ज्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली त्याप्रमाणे अजितदादांचीही साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? तेवढं सांगा! मी जे बोलतो ते पुराव्यासह बोलतो… आणि अजूनही बोलायला भाग पाडलं तर अनेकांना ते परवडणार नाही!”
हे पण वाचा- रायगडामध्ये तटकरेंच्या कोंडीसाठी ‘बारामती पॅटर्न’
सुनील तटकरे रोहित पवारांबाबत काय म्हणाले होते?
माझ्याबद्दल वक्तव्य करणारे रोहित पवार हे २०१९ मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुणाच्या मार्फत आपल्या वडिलांना घेऊन विनवण्या करत होते. या बाबतची माहिती आमच्याकडे आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे हे महाशय कर्जत जामखेड विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा देऊन, भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी आपल्या वडिलांसह कुणाला घेऊन किती वाट पाहत होते हे मला माहीत आहे. अशा बालबुद्धी असलेल्या व्यक्तीबद्दल मला फारसं काही बोलायचं नाही, असं सुनील तटकरे म्हणाले होते. त्या टीकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.