शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत हे रोज सकाळी माध्यमांना बाईट देतात. विरोधकांवर त्यांनी सकाळी केलेली टीका दिवसभर चर्चेचा विषय ठरते. भाजपा आणि शिंदे गटाकडून राऊतांच्या या सकाळच्या पत्रकार परिषदांवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हेदेखील आता रोजच माध्यमांना प्रतिक्रिया देताना सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत असतात. राज्याच्या सर्वच विषयांवर ते आपले मत व्यक्त करताना सरकारला धारेवर धरतात. रोहित पवारांच्या या भूमिकेवर भाजपाचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली आहे.
आज विधानभवनात रोहित पवार यांनी राज्याच्या विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. त्यांचं बोलून झाल्यानंतर त्याठिकाणी चंद्रकांत पाटील बोलायला आले. चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांकडे पाहून “रोहित पवारांचा आता संजय राऊत झालेला आहे. रोज सकाळी त्यांनी बोललंच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दिली. यावर रोहित पवार यांनी हसत हसत सदर टिप्पणीला दाद दिली आणि आपला संजय राऊत झालेला नाही, असे सांगितले. यानंतर रोहित पवारांनी आपली मागणी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बाजूला नेऊन योजनेची माहिती दिली.
रोहित पवारांनी काय मागणी केली?
तत्पूर्वी रोहित पवार यांनी राज्य सरकारने मुलींचे व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. “ही योजना आणत असताना आणखी अभ्यास करण्याची गरज होती. वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थीनींना यातून वगळण्यात आले आहे. या कोर्सेसचे शैक्षणिक शुल्क अधिक नसते मात्र ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना तेवढंही शुल्क भरणं अशक्य होतं. त्यामुळे या योजनेत वाणिज्य, कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही सामावून घ्यावे”, अशी मागणी त्यांनी केली.
“मुलींसाठी सरकार योजना आखत आहेच, त्याशिवाय मुलांसाठीही योजना आणण्याची गरज आहे. पाच हजार कोटी या योजनेसाठी सरकारला लागणार आहेत. त्यामुळे मुलांसाठीही योजना आणावी”, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच राज्यात पोलीस भरती सुरू आहे. पण त्याचवेळी पाऊसही खूप सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी मैदानी चाचणी देण्यात अडचणी येत आहेत. मैदानात चिखल साचला असतानाही उमेदवारांना तिथे पळवले जात आहे. चिखलात पळल्यामुळे तिथे चाचणी देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होऊ शकतो, त्यामुळे पाऊस असताना पोलीश भरती पुढे ढकलण्यात यावी. तसेच भरती पुढे ढकल्यानंतर मुलांचे वय वाढल्यास त्याचाही विचार व्हावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.