सोलापूर : करमाळा तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पाटील यांनी आपल्या पॅनेलला उघडपणे विरोध करून विरोधकांना साथ दिली, असा आरोप त्यांच्याच पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी केला आहे.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या संजीवनी पॅनल सर्व २१ जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. त्यांच्या विरोधात आव्हान दिलेले माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलला एकही जागा मिळविता आली नाही. ते स्वतः पराभूत झाले.
या निवडणुकीत आमदार नारायण पाटील व खासदार मोहिते-पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पाटील यांचे कट्टर समर्थक तथा बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्या बाजूने यंत्रणा उभी केली होती. शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही आदिनाथ साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. कर्जत तालुक्यातील राजकारणाचे प्रतिबिंब आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीतही उमटले होते. तेथून प्रतिनिधित्व करणारे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया म्हणून तेथील भाजपचे नेते, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही आपला पाठिंबा आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलला जाहीर केला होता.
या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आमदार नारायण पाटील यांनी आपल्याच पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी विरोधात घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आमदार रोहित पवार यांचे निकटचे अनुयायी सुभाष गुळवे हे आमच्या विरोधात होते. त्यांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित होते. गुळवे हे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष असून, त्यांचे विश्वासू सहकारी आहेत. आमदार रोहित पवार यांच्या संमतीशिवाय गुळवे यांनी आमच्या विरोधकांच्या मागे मोठी ताकद उभी केली होती. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आमदार रोहित पवार यांचा विरोध दिसून आला. मात्र, त्यांच्या विरोधात आपण कोणाकडेही तक्रार करणार नाही, असा निर्वाळाही आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.
सत्ता मिळाल्यानंतर आदिनाथ साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतःहून मदत घेणार नाही. मात्र तरीही सहकारी साखर कारखाना टिकविण्यासाठी विरोधकांचा साखर कारखाना म्हणून ते आम्हास निश्चित मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, याबाबत आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.