लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून राज्यातील नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक नेत्यांकडून विधानसभेच्या जागावाटपाबाबत विधानं केली जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आगामी विधानसभेत ८५ जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. शरद पवारांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना ८५ आमदार निवडून देऊ असा निर्धार रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा निर्धार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

“येत्या डिसेंबर महिन्यात शरद पवार यांचा ८५वा वाढदिवस आहे. खरं तर त्यांना त्यांच्या वयाबाबत बोललेलं आवडत नाही. मात्र, त्यांच्या ८५ वाढदिवसानिमित्त ८५ आमदार निवडून आणण्याचा निर्धार मी केला आहे. माझी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, की आपण सगळे यासाठी जोमाने प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार वातावरण? समर्थकांमध्ये सोशल मीडियावर जुंपली

“निष्ठावान कार्यकर्त्यांन तिकीट वाटपात प्राधान्य द्या”

“मागच्या काही दिवसांत अनेक जण पक्ष सोडून गेले. त्यापैकी काही जणांना परत येण्याची इच्छा आहे, मात्र, माझी पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, जरी हे लोक परत माघारी आले, तरी तिकीट वाटपात त्यांना प्राधान्य देऊ नये, जे लोक संकटाच्या काळात पक्षाबरोबर राहिले, त्याच निष्ठावान कार्यकर्त्यांन तिकीट वाटपात प्राधान्य मिळालं पाहिजे”, असेही ते म्हणाले.

“विजयाची लय विधानसभेतही कायम ठेवायची आहे”

“काही कार्यकर्ते हे दोन्ही पक्षात ( अजित पवार गट आणि शरद पवार गट ) आहेत. कुणाचे वडील आपल्या पक्षात तर मुलगा अजित पवारांबरोबर आहेत. मात्र, हे योग्य नाही, आम्ही हे खपून घेणार नाही. त्यांना कोणाताही एक पक्ष निवडावा लागेल”, अशी तंबीही रोहित पवार यांनी दिली. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, “ज्याप्रमाणे आपण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला, मेहनत घेतली, तीच लय आपल्याला विधानसभेतही कायम ठेवायची आहे. विधानसभेत महाविकास आघाडीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.”

हेही वाचा – संघाच्या मुखपत्रातून भाजपावर केलेली टीका रोहित पवारांना अमान्य; पोस्ट शेअर करत म्हणाले, “संपूर्ण देशात…”

महेश तपासेंकडून ८५ जागा जिंकण्याच्या लक्ष्याचा पुनरुच्चार

दरम्यान, रोहित पवारांव्यतिरिक्त शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही ८५ जागा जिंकण्याच्या लक्ष्याचा पुनरुच्चार केला. “येत्या विधानसभेत ८५ जागा जिंकण्याचं आमचं लक्ष्य आहे. लोकसभा निवडणुकीत आमची यशाची टक्केवारी ८० टक्के राहिली आहे. हीच लय आम्हाला विधानसभेतही कायम ठेवायची आहे”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar launches mission 85 for assembly polls for sharad pawar ncp 85th birthday spb
Show comments