बारामतीसह महाराष्ट्रातील ११ तर देशभरातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदानाला अवघे २४ तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराची रविवारी सांगता झाली. यात सर्वांचं लक्ष होतं ते बारामती लोकसभा मतदारसंघावर. बारामतीमध्ये शरद पवार गट व अजित पवार गट अशा दोघांच्याही सांगता सभा पार पडल्या. यावेळी एकमेकांवर टीका-टिप्पणी पाहायला मिळाली. त्यात एकीकडे रोहित पवार भाषणात भावनिक झाल्यानंतर दुसरीकडे अजित पवारांनी भाषणादरम्यान त्यांची नक्कल केली. यावर आता रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे.
आधी रोहित पवार झाले भावनिक…
बारामतीमधील प्रचारसभेत रोहित पवारांनी पक्ष फुटला तेव्हाचा प्रसंग सांगितला. “पक्ष फुटला तेव्हा मी आणि काही कार्यकर्ते-पदाधिकारी शरद पवारांसोबत बसलो होतो. ते टीव्हीकडे पाहात होते. ते सगळं झाल्यानंतर बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की हा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे. जोपर्यंत नवी पिढी ती जबाबदारी घेत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले. यावेळी ते भावुक झाल्याचं दिसलं.
मग अजित पवारांनी केली नक्कल…
दुसरीकडे अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी प्रचारसभा घेत होते. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल करत त्यांना टोला लगावला. “शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं मी सांगितलं होतं. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यांतून पाणी काढून दाखवलं. मीही दाखवतो. मलाही मतदान करा”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी ‘मीही दाखवतो’ म्हणताना अजित पवारांनीही कार्यकर्त्यांना डोळा मारला, खिशातून रुमाल काढला आणि तो डोळ्यांना लावला.
“तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे आम्ही पाहिले”
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी रोहित पवारांवर टीकाही केली. “ही नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाही. तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा रडीचा डाव झाला. साहेब नको म्हणाले असतानाही यांना जिल्हा परिषदेचं तिकीट मी दिलं. कर्जत-जामखेडला आम्ही मदत करू असं सांगून तिथूनही तिकीट दिलं. आम्ही तुम्हाला राजकारणाचं बाळकडू पाजलं आणि तुम्हीच आमच्यावर टीका करता? तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पावसाळे-उन्हाळे आम्ही पाहिले आहेत”, असा टोला अजित पवारांनी लगावला.
रोहित पवारांचं प्रत्युत्तर
दरम्यान, अजित पवारांनी नक्कल केल्याचा उल्लेख करत रोहित पवारांनीही त्यांना कुटुंबाची आठवण करून देत प्रत्युत्तर दिलं आहे. “अजितदादा, तुम्ही माझी नक्कल केल्याचं समजलं. पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यांतील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर शरद पवार जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत. त्यासाठी विचार, काळीज, जिवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं”, असं रोहित पवार यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय, “वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे अर्थात मंगळवारी मतदान होत असून इथे पवार कुटुंबातच थेट सामना पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत.