Rohit Pawar X Post: महाराष्ट्रात सध्या प्रचंड राजकीय उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या तीन पक्षांच्या महायुतीला जनतेनं भरभरून जागा निवडून दिल्या. महायुतीनं २३५ जागांनिशी सत्तास्थापनेवर दावा केला. अवघ्या ४९ जागा देत महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवलं. पण निकाल लागून एक आठवडा उलटून गेला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क चालू असून विरोधकांकडून खोचक टीका केली जात आहे.

काय लागले निकाल?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३५ जागा मिळाल्या. त्यात एकट्या भाजपानं १३२ जागा जिंकल्या असून अजित पवारांच्या पक्षाला ४१ तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीला कोणत्याही अडथळ्याविना थेट सत्ता स्थापन करण्याचा मार्ग निकालाच्या दिवशीच मतदारांनी मोकळा करून दिला. पण त्यानंतरही आठवड्याभरापासून सत्ता काही स्थापन होऊ शकलेली नाही. यात विद्यमान विधानसभेची मुदत संपूनही चार दिवस उलटले. पण नवं सरकार अस्तित्वात आलेलं नसून एकनाथ शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहात आहेत.

हा सगळा राजकीय सारीपाट रंगलाय तो मुख्यमंत्रीपदाच्या भोवती. भाजपाला राज्यातला आणि महायुतीतलाही सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे देवेंद्र फडणवसांना मुख्यमंत्री केलं जावं अशी मागणी पक्षातून होत आहे. केंद्रीय नेतृत्वाचा त्याला हिरवा कंदीलदेखील मिळाल्याची चर्चा आहे. पण फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद निश्चित मानलं जात असलं, तरी मंत्रिमंडळातील इतर खात्यांचं वाटप तिन्ही पक्षांमध्ये कसं करायचं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी एक्सवर खोचक शब्दांत पोस्ट केली आहे.

“…लग्नाला आलेले ताटकळत उभे आहेत”

रोहित पवारांनी राज्यातल्या सध्याच्या राजकीय स्थितीला लग्न समारंभाची उपमा दिली आहे. “लग्न ठरलंय, मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीला मुलगा पसंत आहे. मात्र आता लग्नाच्या दिवशी मुहूर्तावर मुलगा लग्नास नकार देत आहे. कारण काय, तर मंत्रिपदाच्या रुपात मिळणारा हुंडा मनासारखा मिळत नाही. यात लग्नाला आलेले लोक (जनता) मात्र ताटकळत उभे आहेत. दुसरं काय बोलणार?” असं रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sharad Pawar: आता निवृत्ती नव्हे, शरद पवार पुन्हा कंबर कसून तयार; कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?

शिवसेनेला गृहमंत्रीपदाची अपेक्षा?

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर गृहमंत्रीपदाची अपेक्षा आहे. पण गृहखातं हा देवेंद्र फडणवीसांचा आवडता विषय मानला जातो. त्यामुळे गृहखातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे अजित पवारांनी अर्थखात्यामध्ये चांगलाच जम बसवल्यामुळे ते खातं अजित पवारांना मिळेल असं आता निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पक्षानं सत्तेत सहभागी व्हायचं तर कोणत्या मंत्रि‍पदांचा स्वीकार करून? याभोवतीच सध्या पडद्यामागील राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा चालू आहे.