राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह असल्याचं राहित पवार यांनी म्हटलं. त्यांनी या विषयावर ट्वीट करत भगतसिंह कोश्यारी यांच्या माफीची मागणी केली.
रोहित पवार म्हणाले, “खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी.
“राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”
हेही वाचा : VIDEO: “समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य
“शिवाजी महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना राज्याची चावी देऊ केली”
“आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.