महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली बंडखोरी, राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यापाठोपाठ नुकतंच विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं. त्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. अशातच दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांनी त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट गुप्तपणे झाल्याची चर्चा सुरू असताना दोन्ही बाजूच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) नेत्यांनी ही कौटुंबिक भेट असल्याचं स्पष्ट केलं. परंतु, या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या भेटीवर शरद पवार यांच्या गटातले आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी त्यांची भूमिका अनेकदा स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी काल (१३ ऑगस्ट) सोलापुरात पत्रकार परिषदेत या भेटीवर स्पष्टीकरणं दिलं. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. एवढ्या मोठ्या नेत्याला तुमच्या (प्रसारमाध्यमांच्या) माध्यमातून सातत्याने भूमिका स्पष्ट करावी लागत असेल तर ते योग्य नाही. त्यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर ती आपल्याला स्वीकारावी लागेल.
आमदार रोहित पवार म्हणाले, मला असं वाटतं की, ही सगळी भारतीय जनता पार्टीची रणनीति आहे. हे जे संभ्रमाचं वातावरण आहे, ते सातत्याने राहिलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. जेणेकरून भाजपाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे ही कदाचित भाजपाचीच करणी असावी. हे लोक (भाजपा) मुद्दाम अशी चर्चा सातत्याने घडवून आणत आहेत.
भीष्म पितामहांकडून ही अपेक्षा नाही, संजय राऊतांची टीका
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर स्वतः शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांचं मत माडलं आहे. खासदार राऊत म्हणाले, “रोहित पवार, शरद पवार यांची वक्तव्ये मी पाहिली. शरद पवार म्हणाले ते माझे पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचीसुद्धा नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्ये मी ऐकली. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? हा प्रश्न आहे. उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो तर काय होईल? आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचं, नातीगोती सांभाळायची आणि खाली कार्यकर्त्यांनी मग आपल्या विचारसरणीसाठी एकमेकांविरोधात लढायचं? शिवसेनेच्या डीएनएमध्ये असं ढोंग नाही.
हे ही वाचा >> हिमाचलमध्ये ढगफुटी, शिमल्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, सोलानमध्ये ७ बळी
संजय राऊत म्हणाले, ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. त्यात महाभारताप्रमाणे स्वकीय, मित्र, नातीगोती यांची पर्वा आम्हाला करता येणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. लोकांमध्ये संशय आणि संभ्रम येईल अशी भूमिका किमान भीष्म पितामहांकडून तरी अपेक्षित नाही.