राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक दिवसांपासून दावे-प्रतिदावे केले जाते आहेत. यात आता स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उडी घेतली. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जातं. पण, अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
“मी आव्हान देऊन सांगतो, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहणार. अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेलं गणित आहे. तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार तरी कसे?” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.
“भाजपानेच संभाजीराजेंनी संदेश दिला असावा”
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने संभाजीराजेंच्या विधानाबद्ल प्रश्न विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “संभाजीराजेंनी केलेल्या वक्तव्यावर मी काय बोलणार? संभाजीराजे काही प्रमाणात भाजपाच्या जवळचे आहेत. भाजपानेच संभाजीराजेंनी संदेश दिला असावा, असं मला वाटतं. त्यामुळे संभीजाराजेंच्या व्यक्तव्यावर मला काही बोलता येणार नाही.”
हेही वाचा : “…तेव्हा फडणवीसांच्या पाया पडले”, मुश्रीफांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड प्रत्युत्तर देत म्हणाले…
“मलिकांची परिस्थिती अडचणीची”
नवाब मलिकांबरोबर राजकीय चर्चा झाली का? या प्रश्नावर रोहित पवारांनी म्हटलं, “नवाब मलिक आणि आमचं व्यक्तिगत नातं आहे. ते अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज त्यांची तब्येत बरी नाही. सध्या त्यांची परिस्थिती अडचणीची आहे. त्यामुळे आम्ही केवळ त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तिथे कुठलीही राजकीय चर्चा केली नाही. केवळ त्यांच्या आरोग्यासंदर्भात बोललो.”
हेही वाचा : “तेलगी प्रकरणात चार्जशीटमधील नावं खोडणारा अदृश्य हात कुणाचा?”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट
“आजारपणात आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं”
“अशा परिस्थितीत केवळ माणूसकी महत्त्वाची असते. नवाब मलिक हे सध्या आजारी आहेत. या आजारपणात आरोग्याची काळजी घेणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं. कुठलाही पदाधिकारी, एखादा कार्यकर्ता आजारी असेल, तर राजकारण न करता माणुसकीने त्याकडे पाहायला हवं, ही आम्हा सर्वांची भूमिका आहे,” असं रोहित पवारांनी सांगितलं.